विसर्जनादरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी : नगराध्यक्ष

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना विसर्जनादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. विसर्जन स्थळांसह मिरवणूक मार्गावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना लोकनियुक्त नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.

श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने सिल्लोड येथील श्री महादेव मंदिर परिसरातील पारंपरिक बारव येथे नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. तसेच जळगाव रोडलगत असलेल्या पाझर तलाव परिसरातील नगर परिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम पर्यावरणपूरक गणेश विसर्जन स्थळाच्या कामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.

यावेळी त्यांनी मिरवणूक मार्गाचाही आढावा घेतला. मिरवणूक मार्गावरील राहिलेली रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने
पूर्ण करावीत, तसेच रस्त्यांवरील विजेच्या तारा सुरक्षित उंचीवर नेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. 

तसेच पोलीस प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. विसर्जन स्थळांसह आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही अब्दुल समीर यांनी दिल्या.


गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांना पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, सुरळीत वीज पुरवठा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. विसर्जन प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक संदीप राऊत, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गा पवार, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठावळे, वीज वितरण विभागाचे अभियंता धम्मपाल मस्के, नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी अजगर पठाण, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, शेख बाबू, अशोक बनसोड, जितू आरके, जुम्मा खा. पठाण, डॉ. फेरोज खान, शेख बाबर, बबलू पठाण, मधुकर गवळी, नॅशनल सहकारी सूतगणीचे संचालक शंकरराव खांडवे, सयाजीराव वाघ, अक्षय मगर, रवी गायकवाड, शिवा टोंपे, जगन्नाथ कुदळ, सखाराम अहिरे, संजय मुरकुटे, संदीप हाडोळे, फहिम पठाण, संतोष खैरनार, संजय फरकाडे, सतीश शिरसाट, संतोष धाडगे, गणेश चंदनसे, शेख जाकीर हसेन, नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दिकी, सफाई निरीक्षक अन्वर पठाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.